अवश्य वाचा


  • Share

सहकारातील आधारवड हरपला जेष्ठ नेते हरिभाऊ वर्पे यांचे वृध्दपकाळाने निधन

संगमनेर (प्रतिनिधी) - संगमनेर तालुक्याच्या विकासातील बिनीचे शिलेदार, सहकारातील जेष्ठ नेते, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे खंबीर सहकारी, हरिभाऊ राधाकृष्ण वर्पे पाटील यांचे शनिवार दि. 5/12/2020 रोजी चिकणी येथे सायंकाळी 4 वाजता निधन झाले आहे. त्यांनी अमृत उद्योग समूहाच्या उभारणीत मोठे योगदान देत असताना संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे दोन वेळा संचालक, गरूड कुक्कुटपालन सहकारी संस्थेचे चेअरमन, संगमनेर पंचायत समितीचे सभापती, भूविकास बँकेचे संचालक, संगमनेर तालुका सेवा सोसायटी केडरचे अध्यक्ष, निवृत्तीनाथ महाराज ट्रस्ट त्र्यंबकेश्‍वरचे विश्‍वस्त, भागवतबाबा देवस्थानचे विश्‍वस्त यांसारख्या अनेक संस्थांचे पदाधिकारी म्हणून कार्य केले आहे. सहकाराबरोबरच सामाजिक, वारकरी सांप्रदायात त्यांचे मोठे योगदान आहे. निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळ्याचे ते प्रमुख मार्गदर्शक होते. शिक्षण क्षेत्रातील जेष्ठ अ‍ॅड. भगीरथीजी शिंदे यांचे ते मेव्हणे होते. त्यांच्या पश्‍चात विलासराव, बाळासाहेब, भाऊसाहेब, नानासाहेब, कुसुम सातपुते अशी अपत्ये, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर रविवार दि. 6/12/2020 रोजी सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. हरिभाऊ वर्पे यांचे निधनाने सहकारक्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना तालुक्याचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. आ. डॉ. सुधीर तांबे यांनीही हरिभाऊ वर्पे यांच्या प्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. जेष्ठ नेते हरिभाऊ वर्पे दादा यांचे स्मृतींना दैनिक युवावार्ता परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन !