मनुष्यप्राणी हा सतत आनंदाच्या, सुखाच्या शोधा...Read more
मनुष्यप्राणी हा सतत आनंदाच्या, सुखाच्या शोधात असतो.“ सुख पावे जवापाडे, दु:ख पर्वताएवढे” असे असले तरी मानवाची सुखासाठीची धडपड कधीच थांबली नाही. सुखाच्या संकल्पना ह्या अनेक असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. मनुष्याने केलेल्या कृतीतून आनंद मिळविणे म्हणजे सुख अशी कल्पना केली तर सामाजिक सेवेतील आनंद, व्यवसाय वृद्धीतील आनंद, सत्ता व संपत्ती मिळविण्यातील आनंद, बौद्धीकता वाढीतील आनंद व्यक्तींना सुख मिळवून देत असतो. दिवळी सण हा सुद्धा जीवनात आनंद निर्माण करणारा असल्याने वर्षभर अनेक अडचणी सहन करुन दिवाळीला मात्र आनंदी, सुखी, समाधानी असले पाहिजे असे प्रत्येकास वाटते. ही संकल्पना हिंदू धर्मासाठी आहे तशीच संकल्पना इदनिमित्त मुस्लिम बांधवांची असते तर ख्रिसमस (नाताळ) हा सण ख्रिश्चन बांधवांना दिवाळीसारखा असतो. जीवनात आनंदाचे क्षण शोधून सुखी होणे ही मानवी जीवनाची अगम्य वाटचाल आहे. प्रत्येक दिवाळी दरवर्षी नवे बदल घेऊन येते. या वर्षातील महत्वाचे बदल काय? नाविण्य काय असा विचार केला तर पुरेसा पाऊस आणि तंत्रज्ञानाचा वाढलेला वेग या नाविण्याच्या गोष्टी आहेत. आपला देश कृषिप्रधान असल्याने पुरेसा पाऊस व अन्नधान्य निर्मिती ही महत्वाची असल्याने पाऊस ही सर्वांची मुलभूत गरज आहे. पुरेसा पाऊस ही बाब आनंदाची व सुख देणारी आहे. मागील अने क वर्षे दु ष्काळाची गे ल्यानं तर पाण्याचा व्यवस्थित व काटकसरीने वापर केल्यास पुढील दोन वर्षे तिव्र पाणीटंचाई जाणवणार नाही. संपर्क व प्रसार माध्यमांतील नाविण्यपुर्ण बदल मात्र सर्वत्र सुखदायी आहे असे वाटत नाही. समाजसंपर्क माध्यमाने अनेक सोई केल्या तसेच गैरसोयीही केल्या. विश्वसार्हता ही अतिशय महत्वाची गोष्ट सामाजिक प्रसारमाध्यमांमुळे धोक्यात आल्यासारखी वाटते. मानवी चित्र-विचित्र भावना, सुसंस्कृत-विकृत संकल्पना, सत्य असत्य माहिती यामुळे सामाजिक प्रसारमाध्यमांतील माहिती व सत्यता नेहमी इतरत्र तपासून घ्यावी लागते. भ्रमनध्वनी क्षेत्रातील बदल व स्पर्धा, इंटरनेट क्षेत्रातील नवीन सुविधा, विविध राज्याती व देशातील सत्ताबदल या सर्व नाविण्यपूर्ण घटना मानवी जीवनास गती देणार्या व प्रगतीदायक वाटत असल्या तरी गतीवरील नियंत्र सुटल्यास अपघाताची शक्यता निर्माण होते. तसेच मानवी वाटचालीचा दर्जा घरसल्यास ‘कोपर्डी’ सारख्या अनेक घटना घडतात व समाजमन अशांत, अस्वस्थ बनते. महाराष्ट्रातील मराठा समाजाचे प्रत्येक जिल्ह्यातून निघालेले क्रांती मुक मोर्चे अस्वस्थ जीवनाची साक्ष देतात. अभूतपूर्व, लाखोंच्या संख्येतील शिस्तबद्ध मराठा समाजाचे मोर्चे म्हणजे अहिंसा पद्धतीने घडलेली फार मोठी क्रांती आहे. संस्कार, संस्कृती, शास्त्र व मानवता या गोष्टी मानवी जीवन स्थिर, आनंदी ठेवण्यासाठी महत्वाच्या आहेत. संस्कृतीचा र्हास झाला की विकृती फोपावते आणि मानवी जीवन अस्वस्थ होते. सैराट लैंगिकता, व्यसनाधिनता आणि व्यवहारातील फसवणूका विकृती वाढवितात. संस्कारांचे संवर्धन व विकृतीचे निर्दालन करण्यासाठीचे आत्मपरिक्षण, चिंतन करण्याचा सण म्हणजे दिवाळी असे म्हटले तर वावगे होणार नाही. दिवाळी म्हणजे आनंद असे म्हटले तर आनंदनिर्मितीच्या ज्या प्रक्रिया आहेत त्यांना बळ देणे म्हणजे दिवाळी. निरक्षरता व व्यसनाधिनता हटविणे म्हणजे दिवाळी. गरजू व्यक्तींना योग्य मदत करणे व बंधू-भाव वाढविणे म्हणजे दिवाळी. महागाई, अनारोग्याच्या बाबींवर नियंत्रण मिळविणे म्हणजे दिवाळी. धर्मद्वेष, जातीद्वेष, व्यक्तीद्वेष हटविणे म्हणजे दिवाळी. असे विचार करुन समाजाने वाटचाल केल्यास सामाजिक व सामूहिक जीवनात सुख, स्थैर्य, आर्थिक सुबत्ता निर्माण झाली तर वर्षातील प्रत्येक दिवाळी सुखी, आनंदाची व प्रगतीची ठरेल. बदलत्या अधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग मानवजातीच्या भल्यासाठी संस्कार व संस्कृतीचे भान ठेवून राष्ट्रीयता व बंधूता वृद्धींगत करणे म्हणजे दिवाळी होय. दिवाळी अंक निर्मिती हा एक कर्मयज्ञ आहे. साहित्य, मांडणी, छपाई, वितरण, संपर्क अशी चार महिने चालणारी ही निर्मिती प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून प्रतिसाद देणारे साहित्यिक, अंकात पानोपानी लेख व कथांना उत्कृष्टि चित्रांनी सजविणारे आमचे कुशल चित्रकार, उत्कृष्ट अंकनिर्मितीसाठी मदत करणारे आमचे जाहिरातदार, व्यंगचित्रकार, संपादन व जाहिरात विभागातील सर्व सहकारी, वाचक, हितचिंतक या सर्वांच्या एकत्रित सहकार्याचा उत्तम अविष्कार म्हणजे हा दिवाळी अंक. आपण सर्व भारतीय बंधू-भगिणी येणारी दिवाळी आनंदाने व नाविण्यतेने साजरी करण्यासाठी सज्ज होऊ या. यावर्षी दैनिक युवावार्ता व साप्ता. संगम संस्कृती असे दोन दिवाळी अंक प्रकाशित करण्यासाठी सहकार्य करणार्या सर्व मान्यवरांचे व सहकार्यांचे आम्ही ऋणी आहोत. सर्वांना दिवाळी सणाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!