अवश्य वाचा


  • Share

विधान परिषदेचा निकाल मविआ सरकारच्या कामावर लोकांनी दाखवलेला विश्‍वास - ना. थोरात

संगमनेर ( प्रतिनिधी ) विधान परिषद निवडणुकीचा निकाल हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या एकत्रित लढाईचा परिणाम आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 55 वर्षांपासून असलेला नागपूरचा बालेकिल्लाही महाविकास आघाडीने खेचून आणला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने ही आघाडी स्विकारली असून मविआ सरकारच्या एक वर्षाच्या कामकाजावर जनतेने दाखवलेला हा विश्‍वास आहे तसेच भारतीय जनता पक्षाचे खरे रुप जनतेला कळाल्याने ते त्यांच्यापासून दूर गेले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले. ना.थोरात पुढे म्हणाले की, आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून कोरोना महामारी, चक्रीवादळ, अतिवृष्टी अशी संकटं वर्षभर सुरु असतानाही आम्ही एकत्रित चांगली कामं केली, शेतकरी कर्जमाफी दिली, अतिवृष्टीग्रस्तांना 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. त्यामुळे लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिली. कामं केले की जनता पाठीशी उभी राहते. आजच्या निकालाने आघाडीलाही आणखी बळकटी मिळाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या विचारांना, त्यांच्या कामकाजाला लोक कंटाळलेले आहेत. त्यांची घोर फसवणूक झालेली आहे. दिल्लीत शेकडो मैलावरून शेतकरी आंदोलन करण्यासाठी आले आहेत. त्यांचा भाजपावर विश्‍वास राहिलेला नाही. शेतकरी, कामगार कायदे बदलून त्यांना उद्धवस्त करण्याचे काम सुरु आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनानेही देशभरात संदेश गेला. म्हणूनच जनता भाजपासून दूर गेली आहे. आम्ही तीन पक्ष एकत्रित लढलो आणि त्यातून दणदणीत विजय मिळाल्याने ही आघाडी आणखी भक्कम झाली आहे असेही नामदार थोरात म्हणाले.