अवश्य वाचा


  • Share

जरे हत्याकांडात संपादकच आरोपीच्या पिंजऱ्यात

दि. 03।12।2020 जरे हत्याकांडात संपादकच आरोपीच्या पिंजऱ्यात संगमनेर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नेत्या रेखा वायकर-जरे या आपल्या नातेवाईकांसह पुण्याहून घरी नगरकडे परतत असताना सुप्याजवळील जातेगाव घाटात दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने हल्ला करुन रेखा जरे यांचा निर्घुन खून केला होता. मात्र हि हत्या गाडीला मारल्यावरून होऊ शकत नाही हे कुणालाच पटले नाही तसे ते पोलिसांनाही रूचले नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या तिनच दिवसांत या हत्याकांडाचा तपास करीत सर्व आरोपींना उघड करून जेरबंद केले. या बाबत पोलीस अधीक्षकांनी आज दिलेल्या माहितीनुसार जरे हत्याकांडाच्या मागे दैनिक सकाळच्या नगर आवृत्तीचे कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे असल्याचे समोर आले असून बोठे फरार झाले आहे. या वृत्ताने माध्यम क्षेत्रासह राज्यात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार सोमवारी रेखा भाऊसाहेब जरे या आपली आई सिंधूताई सुखदेव वायकर, मुलगा कुणाल व लियमाला माने असे चौघेजण आपल्या कारमधून पुणे येथून अहमदनगरच्या दिशेने येत होत्या. यावेळी त्यांची कार रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सुप्याजवळील जातेगाव घाटात आली असता पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या मोटर सायकलवरील (क्र.एम.एच.17/2380) दोघांनी जरे यांची कार थांबवून आम्हाला कट का मारला, तुम्हाला गाडी चालवता येत नाही असे म्हणत त्यांच्याशी वाद घातला व त्याचवेळी धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार करुन त्यांची निर्घुन हत्या केली. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना सूचना करुन तात्काळ तपासाचे आदेश दिले. गेल्या दोन दिवसांत स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपासाची चक्रे फिरवत गुन्ह्यातील आरोपी राहुरी व कोल्हार परिसरातील फिरोज राजू शेख (वय 26, रा.संक्रापूर, ता.राहुरी) याला ताब्यात घेतले. त्यानंतर ज्ञानेश्‍वर शिवाजी शिंदे (वय 24, रा.कडीत फत्तेबाद, ता.श्रीरामपूर) व आदित्य सुधाकर चोळके (वय 25, रा.तिसगाव फाटा, कोल्हार) यांना वेगवेगळ्या ठिकाणांवरुन अटक करण्यात आली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सागर उत्तम भिंगारदिवे (वय 31, रा.केडगाव) व ऋषीकेश उर्फ टम्या वसंत पवार (वय 23, रा.प्रवरानगर, ता.राहाता) यांना काल अटक करण्यात आली. त्यांची पोलिस कोठडीत पोलिसांनी चांगलेच आदरातिथ्य केल्याने ते पोपटासारखे बोलले आणि सगळीकडे खळबळ उडाली. दैनिक सकाळच्या अहमदनगर आवृत्तीचे कार्यकारी संपादक बाळ ज.बोठे यांचा या प्रकरणात हात असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आणि माध्यम क्षेत्रात एकच खळबळ उडाली. आरोपींनी या हत्याकांडातील मास्टरमाईंडची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी बोठे यांच्या बालिकाश्रम रस्त्यावरील घरावर छापा घातला आणि काही कागदपत्रे ताब्यात घेतले मात्र बोठे आधिच पसार झाला होता. आपल्या लेखनिने अनेकांना घाम फोडणारे आणि अनेकांना न्याय मिळवून देणारेच आता हत्येसारख्या प्रकरणात गजाआड होणार असल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.