संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर महसूल विभागाच्या पथकाने आज बुधवारी सकाळी 6.30 वाजता तालुक्यातील खांडगाव येथे नदी लगत असणार्या एका वस्तीवर कारवाई करून वाळूसाठी व वाळू वाहणारा हायवा तसेच जेसीबी जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून केवळ जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यात वाळू तस्करांचे मोठे रॅकेट असून मुळा, प्रवरा या नद्यांवर वाळू तस्करांनी हैदोस घातला आहे. रात्रं-दिवस बेसुमार पद्धतीने अवैध वाळू उपसा सुरू आहे. या विरूद्ध महसूल विभागाने अनेक वेळा कारवाई करूनही ही अवैध वाळू तस्करी थांबली नाही. दरम्यान आज सकाळी महसूलचे संजय शितोळे, तलाठी संग्राम देशमुख व तलाठी योगिता शिंदे यांनी खांडगाव शिवारातील संतोष ढगे यांच्या वस्तीलगत असणार्या वाळू साठ्यावर व नदी पात्रात असणार्या जेसीबी व हायवा वाहणावर कारवाई करत ही दोन्ही वाहने जप्त केली. तसेच या कारवाईत सुमारे 15 ते 20 ब्रास वाळू महसूल पथकाने जप्त केली. सदर जेसीबी चेतन साकुरे व हायवा ढंपर राहुल गुंजाळ यांच्या मालकीचे असल्याचे समजते. ही दोन्ही वाहनेे जप्त करून पोलिस कॉलनीत जमा करण्यात आली आहे. महसूल विभागाकडून या वाहन मालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. संगमनेर तालुक्यात वाळू तस्करी ही मोठी चिंतेची बाब बनली आहे. या तस्करीतून अनेकजण गडगंज झाले आहे. तर अनेक महसूल व पोलिस अधिकार्यांनी आपले हात धुऊन घेतले आहे. मात्र त्यातून पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. अनेक ठिकाणी प्रचंड वाळू उपश्यामुळे नदी पात्र दुषीत बनले आहे तर पाणी साठ्यावरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. खोल खड्ड्यामुळे नदीपात्रही धोकादायक बनत आहे. त्यामुळे या अवैध तस्करीवर कारवाई होणे गरजेचे आहे. संजय शितोळे, संग्राम देशमुख, योगिता शिंदे यांनी केलेल्या कारवाईचे स्वागत होत आहे.