अवश्य वाचा


  • Share

पो. नि. मुकूंद देशमुखांकडून संगमनेरच्या गुटखा माफियांवर प्रहार गुटखा तस्करीवर सलग धाडी- लाखोंचा माल जप्त, गुन्हे दाखल

संगमनेर (प्रतिनिधी) गुटखा विक्रेत्याच्या गोदामावर छापा टाकून एक लाखाचा गुटखा जप्त केल्याची घटना ताजी असतानाच काल सोमवारी सकाळी पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करून बेकायदेशीररित्या गुटख्याची वाहतूक करणार्‍यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुटख्याच्या पुड्यासह सुमारे 74 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शहरातील पद्मानगर येथे राहाणारा नरसय्या रामदास पगडाल (वय 56) हा आरोपी आपल्या मॅस्ट्रो मोपेड दुचाकीवर गुटख्याची वाहतूक करीत होता. पोलिसांनी शहरातील अकोले नाक्यावरील भराड वस्ती येथे त्याला पकडले. त्याच्याकडून 6 हजार 480 रुपये किंमतीचा हिरा कंपनीचा सुपारी पानमसाला, 1 हजार 620 रुपये किंमतीची रॉयल 777 तंबाखू आणि 30 हजार रुपये किंमतीची मॅस्ट्रो मोपेड दुचाकी जप्त केली. याबाबत कॉन्स्टेबल सुरेश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पगडाल याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 2017/2020 नुसार भा.दं.वि. कलम 188, 272, 273,328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 59, 26 (2) (आयव्ही) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरीक्षक रोहिदास माळी करीत आहेत. दुसर्‍या कारवाईत गोपाळ एकनाथ राठी -(वय 40, रा. साईश्रद्धा चौक, संगमनेर) हा अ‍ॅक्टीव्हा दुचाकीवरुन गुटख्याची वाहतूक करीत होता. शहर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास संगमनेर- अकोले रस्त्यावरील गायछाप कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर त्याला पकडले. राठी आपल्या दुचाकीवर गुटखा ठेवून त्याची वाहतूक करीत होता. त्याच्याकडून 4 हजार 800 रुपये किंमतीचा हिरा कंपनीचा सुपारी पान मसाला, 1 हजार 200 रुपये किंमतीची रॉयल 717, तंबाखू यासह त्याचे तीस हजार रुपये किंमतीची अ‍ॅक्टीव्हा दुचाकी जप्त केली. याबाबत कॉन्स्टेबल अविनाश बर्ड यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन राठी याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 2018/2020 नुसार भा. दं.वि. कलम 188, 272, 273,328 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 कलम 59, 26 (2) (आयव्ही) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत. संगमनेर शहरात गुटख्याची बेकायदेशीर विक्री अनेक महिन्यांपासून सर्रास होत आहे. शहरातील काही गुटखा किंग खुलेआम हा व्यवसाय करत आहेत. गुटखाबंदी असणार्‍या शहरात सर्रास गुटखाविक्री केली जाते. पोलिसांनी सलग दोन दिवस कारवाई करुनगुटख्याला प्रतीबंध करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरात हा गुटखा येतो कोठून, याचा तपास पोलिसांना लावावा, अशी मागणी होत आहे.