अकोले (प्रतिनिधी) अकोले नगरपंचायतीच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपला असून, गुरुवारपासून नगरपंचायतीत प्रशासकराज सुरू झाले. उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी प्रशासक म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. नगरपंचायतीत नगरसेवकांचा 2015 ते 2020 हा पहिला पंचवार्षिक कार्यकाळ बुधवारी (दि.25) संपुष्टात आला आहे, तर पुढील नवनिर्वाचित पदाधिकार्यांची पहिली बैठक होईपर्यंत प्रशासक म्हणून संगमनेर उपविभागीय अधिकार्यांची नियुक्ती झाली आहे. अकोले नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. नगरपंचायत निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झाला असून, प्राथमिक प्रभाग व आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. या आरक्षण व प्रभागरचनेवर हरकतीची मुदतही गुरुवारी संपली. 24 डिसेंबर 2020 रोजी अंतिम आरक्षण व प्रभागरचना जाहीरपणे होणार आहे. यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन फेब्रुवारी अथवा मार्चमध्ये सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. अकोले नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 चा बिगुल वाजला असून, प्रत्येक पक्षाने स्वबळाचा नारा दिला आहे. मोर्चेबांधणीला वेग आला असून, कोविड संकट लक्षात न घेता दिवाळीच्या गोड फराळानंतर तिखट मेजवान्यांना सुरुवात झालेली दिसत आहे. या निवडणुकीत शहरातील सर्व 17 प्रभागांत इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीत सध्या तरी स्वबळाचा नारा दिला आहे. नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी दिसेल का? हा प्रश्न असून राष्ट्रवादी व काँग्रेस सध्या एकत्र दिसते; पण शिवसेना मात्र त्यांच्यापासून दूर दिसते. उद्घाटन कार्यक्रमांच्या निमंत्रणपत्रिकेत सेना-भाजप जवळीक लपून राहिलेली नाही.आमदार डॉ.किरण लहामटे व माजी आमदार वैभव पिचड यांनी नगरपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे चित्र असून, दोन्ही नेत्यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच 17 वॉर्ड पिंजून काढले आहेत. युवा नेते अमित भांगरे यांनीदेखील या निवडणुकीत लक्ष केंद्रित केले आहे.सेनेच्या गोटात वेट अॅड वॉच’ सुरू आहे. दोन ते तीन महिन्यांत बरेच पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे निवडणूक जाहीर झाल्यानंतरच खरेचित्र स्पष्ट होईल.