चंद्रपूर (वृत्तसंस्था) डॉ. विकास आमटे यांच्या कन्या व महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. शीतल आमटे यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याचे समजते. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरी सेवा करत असतानाच सोशल आंत्रप्रनरशिप अभ्यासक्रम पूर्ण करून हेमलकसा, आनंदवन, सोमनाथ येथील संस्थांचं वित्त नियोजन करणे असो की आनंदवनला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवणे असो, अपंगांसाठी ‘निजबल’ आणि बेरोजगार युवकांसाठी ‘युवाग्राम’ उपक्रम राबवणे असो, ‘आनंद मूकबधिर विद्यालय’ आणि ‘आनंद अंध विद्यालय’ या शाळांचे डिजिटलाझेशन असो किंवा मियावाकी पद्धतीने चार जंगले वसण्याचे पर्यावरणीय योगदान असो, आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा डॉक्टर शीतल आमटे सशक्तपणे पुढे चालवत होत्या. ग्रामीण संस्कृतीचे रक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळून तरुणाईचे शहराकडे पलायन थांबवणे हा ध्यास घेतलेल्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांना आनंदवनला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवायचे होते. तांत्रिक, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या खेड्यांना सक्षम करणारा हा उपक्रम असून सौर ऊर्जा, ‘हेल्थ एटीएम’, उपक्रमशीलतेला या स्मार्ट व्हिलेजमध्ये स्थान असेल. आजोबा बाबा आमटे, आई-वडील विकास-भारती आमटे यांच्यासह संपूर्ण आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्याच्या दृष्टीने डॉ. शीतल यांनी 2003 मध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण घेतलं. सामाजिक उद्यमता (सोशल आंत्रप्रनरशिप) हा अभ्यासक्रम पूर्ण केला. वयाच्या चाळिशीच्या आत केलेल्या कामाबद्दल ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने मार्च 2016 मध्ये ‘यंग ग्लोबल लीडर’ म्हणून त्यांची निवड केली होती. पुढे अमेरिकेत जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून लीडरशिपचा कोर्सही शीतल यांनी पूर्ण केला होता. मेडिकल लीडरशिप क्षेत्रात ‘लॅन्सेट कमिशन ऑन ग्लोबल सर्जरी’ सोबत ‘मशाल’ आणि ‘चिराग’ असे दोन कार्यक्रम सुरू केले. दरम्यान शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक चित्रफीत जारी केली होती. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. ही चित्रफीत नंतर दोन तासांतच माध्यमातून हटवण्यात आली होती. त्यात करण्यात आलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले होते. डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती. शीतल यांनी समाजमाध्यमावर जारी केलेल्या चित्रफितीतसुद्धा तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं होतं. अतिशय संघर्षातून पुढे आलेल्या बाबा आमटे व त्यांच्या कुटूंबीयांनी अनेकांना जगण्याचा आधार दिला. मात्र याच कुटूंबातील शीतल आमटेंनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.