पालिकेने आर्थिक नुकसानीचे चिंतन करावे आधी सुशोभीकरण: नंतर विविध कामांसाठी खोदाई संगमनेर (प्रतिनिधी) स्वच्छ, सुंदर, हरित संगमनेरचे स्वप्न रंगवू शहरात पालिकेकडून विविध विकासकामे सुरू आहेत. वृक्षारोपण, बंदिस्त गटारी झाकुन त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, रंगरंगोटी यासारखे अनेक कामे होत असताना दुसरीकडे हेच काम केलेल्या रस्त्यावर विविध कामांसाठी खोदाई केली जात आहे. त्यामुळे पालिकेने केलेल्या या कामावर एकप्रकारे पाणी फेरले जात असून ही कामे म्हणजे वरातीमागून घोडे आहे. नागरिकांच्या कराच्या पैशांची ही सरळ सरळ उधळपट्टी आहे असा आरोप सुज्ञ नागरिक करत आहे. संगमनेर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढत असून येथील बाजारपेठ जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे पालीकेला कर रुपाने मोठा निधी मिळतो. या निधीतून शहरात विकास कामे केली जातात. मात्र हे कामे करताना पालिकेकडून कोणतेही नियोजन केले जात नसल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. चाळण झालेल्या रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण कले जात असताना पालिकेकडून वीज महावितरण, टेलीफोन, स्वच्छता या विभागासह त्या भागातील नागरिकांना विश्वासात किंवा त्यांची नाहरकत प्रमाणपत्र घेतली जात नाही. ठेकेदाराला निधी मिळताच रस्त्यांची रात्रीतून कामे केली जातात. मात्र काही दिवसांतच कधी वीज महावितरणकडून तर कधी टेलीफोन विभागाकडून हे रस्ते खोदले जातात. अनेक वेळा तर पालिकेच्याच स्वच्छता विभागाकडून गटारीसाठी हे नवीन रस्ते खोदले जातात. त्यामुळे केलेले काम वाया जाऊन त्यातून पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होते. तसेच त्या रस्त्यांची गुणवत्ता खराब होऊन रस्ते अल्पावधीतच खड्डेमय होतात. या प्रकारचे अनेक कामे शहरात झाले आहे. व आजही होत आहे. दरम्यान नविन अकोले बायपास रोडच्या दोन्ही बाजूस पालिकेने काही दिवसांपुर्वी पेव्हिंग ब्लॉक टाकून सुंदर असा फुटपाथ तयार केला होता. या ठिकाणी छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी आपला व्यावसाय थाटून त्यावर रोजी-रोटी सुरू केली होती. मात्र महावितरणकडून याच ठिकाणी आता रस्ता खोदून भूमिगत वीज पुरवठ्यासाठी केबल टाकली जात आहे. या कामामुळे येथील पेव्हिंग ब्लॉक पुन्हा उखडले गेले आहे. आगोदरच हा रस्ता खड्डे व धुळीने पुर्णत: खराब झाला असल्याने आता या कामामुळे या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. पालिकेने नागरीकांच्या पैशांची अशाप्रकारे दुरावस्था थाबविण्यासाठी योग्य नियोजन करून विकास कामे व सुशोभीकरण करावे अशी अपेक्षा संगमनेरकर व्यक्त करत आहे.