अवश्य वाचा


  • Share

कोरोना मुक्तीकडे मार्गक्रमण करणाऱ्या संगमनेर मध्ये आणखी एक कोरोना बाधित

सलग दुसर्‍यांदा करोनामुक्तीच्या दिशेने मार्गक्रमण करणार्‍या संगमनेर शहराला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. शहरातील इस्लामपूरा परिसरात राहणार्‍या एका वयस्कर व्यक्तिला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सात जणांना आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे. तेथे त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाणार आहे. गेल्यावेळीही संगमनेर करोनामुक्त होत असतानाच धांदरफळ आणि कुरणरोडचा प्रकार समोर आला, तर यावेळी शहरातील व्यक्तिला करोनाची बाधा असल्याचे नाशिक जिल्हा रुग्णालयात स्पष्ट झाले. त्यातच गेल्या दोन दिवसांत तालुक्यातील निमोण व चणेगाव येथील प्रत्येकी एकाला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने संगमनेरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील इस्लामपूरा भागात राहणार्‍या एका सत्तर वर्षीय इसमाची हृदय शस्त्रक्रीया करण्यासाठी त्यांना नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी करताना त्या रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाला संशय आल्याने त्यांनी त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. संबंधिताच्या नातेवाईकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा स्वॅब घेवून तो तपासणीसाठी पाठविला गेला. त्याचा अहवाल गेल्या 11 मे रोजीच नाशिक जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आला होता. त्यानुसार संगमनेरातील ती व्यक्ति करोना संक्रमीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबाबत नाशिक जिल्हा प्रशासनाने रविवारी रात्री संगमनेरच्या प्रशासनाला माहिती दिल्याने आज (ता.18) दुपारी साडेचारच्या सुमारास संगमनेरच्या आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने त्या रुग्णाच्या संपर्कातील त्याच्या सात नातेवाईकांना ताब्यात घेवून त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेले आहे. तेथे त्यांची आरोग्य तपासणी करुन त्या सर्वांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाणार आहे. दोनच दिवसांपूर्वी तालुक्यातील निमोण परिसरातील एका व्यक्तिला करोनासारखी लक्षणे दिसू लागल्याने जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते, तर चणेगावमधील एकजण आरोग्य दाखला घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेला असता तपासणीत त्यालाही लक्षणे दिसल्याने त्या दोघांनाही नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करुन त्यांचे स्वॅब घेवून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आज सायंकाळी उशीरापर्यंत त्या दोघांचेही अहवाल मिळण्याची शक्यता आहे. इसलामपूरातील सदरचा रुग्ण हृदय शस्त्रक्रीयेसाठी गेल्या 8 मे रोजीच नाशिकमधील एका मोठ्या खासगी रुग्णालयात गेला होता. मात्र शस्त्रक्रीयेपूर्वी त्याची आरोग्य तपासणी केली असता त्या रुग्णालयाच्या डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्याच दिवशी त्यांचा स्त्राव घेवून तो तपासणीसाठी पाठवला असता 11 मे रोजी त्याचा अहवाल प्राप्त झाला, त्यात सदरच्या रुग्णाला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. असे असतांनाही त्या रुग्णाचे नातेवाईक गेल्या आठ दिवसांपासून समाजात वावरत असल्याने परिसरात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. सदरच्या रुग्णाबाबतची माहिती नाशिक जिल्हा प्रशासनाने उशीरा कळविली की जिल्हा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले हा संशोधनाचा भाग ठरेल. मात्र या प्रकाराने सलग दुसर्‍यांदा करोना मुक्तीच्या दिशेने मार्गक्रमण करणार्‍या संगमनेर शहराला या घटनेने मोठा धक्का बसला आहे.