अवश्य वाचा


  • Share

एकनाथ खडसेंसाठी आमची दारं कायम खुली - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

मुंबई- भाजपा नेते एकनाथ खडसेंसाठी आमची दारं कायम खुली असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. मात्र आपण एकनाथ खडसे यांना पक्षात येण्यासाठी कोणतीही ऑफर दिली नसल्याचंही यावेळी त्यांनी स्प्ष्ट केलं. आम्ही कोणतीही ऑफर दिलेली नाही. पण त्यांचं स्वागतच करू, असं बाळसाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला असून करोनाचं संकट संपल्यानंतर नि र्णय घेऊ असं म्हटलं आहे. एकनाथ खडसे माझे फार जुने मित्र आहेत. 1990 ला विधानसभेत आले तेव्हापासून आम्ही एकत्र काम करत आहोत. पक्ष वेगळे असले तरी आमच्यात मैत्री आहे. एक समर्थ विरोधी पक्षनेता आम्ही त्यांच्यात पाहिला. असा नेता जर काँग्रेसच्या विचारासोबत येत असेल तर आम्ही स्वागतच करू. ऑफर दिली की नाही हे महत्त्वाचं नसून आम्ही त्यांचे स्वागतच करू, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. आम्ही कोणतीही ऑफर दिली नाही. भाऊ आम्ही सोबत आहोत असं बोलल्याचा अर्थ तुम्ही कसाही लावू शकता. भाजपा पक्षात होणारी एकनाथ खडसेंची अवहेलना पहावत नाही. काँग्रेसची दारं एकनाथ खडसेंसाठी नेहमी खुली आहेत, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. भाजपाला जनमानसाचा आधार असलेला, स्वावलंबी नेता नको असतो असं मला वाटतं. भाजपात बहुजन समाजाच्या नेत्याचा प्रभाव वाढू नये याची काळजी नेहमी घेतली जाते. भाजपाचा अभ्यास केला तर तसा तर्क काढला जाऊ शकतो. पक्षात राहूनही एकनाथ खडसेंना अंतरंग उशिरा कळले, असंही यावेळी त्यांनी सांगितलं. इतर नाराज नेत्यांना संपर्क करण्याचा काँग्रेसने कोणताही प्रयत्न केलेला नाही आणि करणार नाही. पण त्यांनी भाजपाची पुढील रणनीती देशाच्या आणि आपल्या हिताची आहे का हे ओळखणं गरजेचं आहे, असा सल्ला बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.