अवश्य वाचा


  • Share

फी अभावी परिक्षेसाठी बसू न देणार्‍या शाळेवर गुन्हा दाखल

संगमनेर (पतिनिधी) शाळेची फी भरली नाही. या कारणावरून लहान मुलाला परीक्षेला बसू न देता त्याच्यासह अन्य काही विद्यार्थ्याना वर्गाबाहेर उभे करण्याचा धक्कायक प्रकार घडला इंगजी माध्यमाच्या शाळेतील या प्रकाराची पोलिसांकडे फिर्याद देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याच्या पालकाला पोलिसांनी बाहेरचा रस्ता दाखवला मात्र प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे निर्माण झाल्याने अखेर अडीच महिन्यानंतर शहर पोलिस ठाण्यात यासंदर्भात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. संगमनेर जवळील कोल्हेवाडी रस्त्यावरील अलाईड एज्युकेशन सोसायटीच्या नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हा प्रकार घडला. स्थानिक पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजवून थकलेल्या तक्रारदाराने यासंदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडेच कैफियत मांडली. मोहसीन रहेमान मणियार यांच्यातक्रारीवरून मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियमाद्वारे संस्थेचे हाजी अब्दुल करीम आणि नाझीम अब्दुल करीम तांबोळी (दोघे लोणी, ता. राहाता) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहसीन मणियार यांचा मुलगा या संस्थेत केजीमध्ये शिकतो. फी न भरल्याने शिक्षकांनी त्याला परीक्षेला बसू दिले नाही. वर्गाच्या बाहेर उभे केले. घरी आल्यानंतर मुलाने हा प्रकार पालकांना सांगितला. त्यामुळे मणियार 27 फेब्रुवारीला शाळेत गेले. शाळेतील कर्मचारी, व्यवस्थापकांना भेटण्याअगोदर ते आपल्या मुलाच्या वर्गाकडे गेले असता तेथे परीक्षा सुरू होती काही विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभे करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी वर्गशिक्षिकेकडे मुलांना तुम्ही परीक्षेला का बसू देत नाही, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी ज्या मुलांच्या पालकांनी फी भरलेली नाही, त्यांना परीक्षेला बसू देऊ नका व त्यांचे पेपर लिहून घेऊ नका, असा नाझीम तांबोळी यांचा आदेश असल्याचे सांगितले. तांबोळी यांनी देखील फी भरत नाही तोपर्यंत मुलाला परीक्षेला बसू देणार नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकारामुळे मुलाचा मानसिक छळ होत असल्याचे सांगितल्याने त्यांनी अरेरावी करत शाळेचे नियम ठरवणारे तुम्ही कोन अशी विचारणा करत असे केले, तरच पालक मुकाट्याने फी आणून देतात. शाळेच्या एकूण फीपैकी पाच हजार रूपये भरले असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात तक्रार देण्यासाठी 3 मार्चला शहर पोलिस ठाण्यात गेलेल्या मोहसीन मणियार यांना सहायक निरीक्षक गोपाल उंबरकर यांना भेटण्याचा सल्ला ठाणे अंमलदाराने दिला. उंबरकर यांनी तक्रार ऐकून घेत शाळेची तक्रार शिक्षण विभागाकडे करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर निरीक्षक परमार यांची भेट घेतल्यावर त्यांनी उंबरकर यांना चौकशी करण्यास सांगितले. दरम्यान उंबरकर यांनी शाळेच्या व्यवस्थापकांना बोलावून घेत त्यांच्याकडे चौकशी केली. उंबरकर यांनी दोन-तीन दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन दिले मात्र, नंतर वेगवेगळी कारणे सांगत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे मणियार यांना अखेरीस जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्याकडे कैफियत मांडावी लागली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.