अवश्य वाचा


  • Share

नगर जिल्ह्यातील सर्वच तलावांनी गाठला तळ

अहमदनगर(प्रतिनिधी) स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत जिल्ह्याने अनेक दुष्काळ पाहिले आहेत; पण यावर्षीच्या दुष्काळाने कहरच केला आहे. 1972 च्या दुष्काळाची आठवण व्हावी, अशी परिस्थिती ओढवली आहे. दुष्काळाने हाहाकार माजवला असून पाण्याच्या एकेका थेंबासाठी जनता तडफडत आहे. जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाच्या शुन्य ते 100 हेक्टरपर्यंतचे सिंचन क्षमतेचे पाझर तलाव, गाव तलाव व साठवण तलाव असे सर्वच्या सर्व 1 हजार 239 तलाव कोरडे ठणठणीत पडल्याने येथे पाण्याचा टिपूसही पाहायला मिळत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याचाही प्रश्‍न गंभीर बनला आहे. दुष्काळी पट्ट्यात तर अनेकांनी स्थलांतर सुरू केले आहे. या भयावह परिस्थितीने जनतेला जगणंच नकोसं झालं आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थितीने हाहाकार उडाला आहे. प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही. कवडीमोल किमतीत पशुधन विकलं जात असून जगायचं कसं असा प्रश्‍न दुष्काळी पट्ट्यात सतावत आहे. या दुष्काळी पट्ट्यासह अन्य तालुक्यांतही हे चटके बसत आहेत. पाण्यासाठी तर जनता कासावीस आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होऊ लागल्यामुळे जिल्ह्यातील तलाव व धरणांतील पाणीसाठे कोरडे पडू लागले आहेत. जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाकडून पाझर तलाव, गाव तलाव, साठवण तलाव, यासह लघु पाटबंधारे तलाव, उपसा सिंचन योजना, साठवण किंवा वळवणी बंधारे, सिमेंट बंधारे शुन्य ते 100 हेक्टर सिंचन क्षमता असलेले तलाव उभारण्यात आले आहे. परंतू आज या तलावामध्ये एक थेंब देखील पाणी नाही. जिल्ह्यात 838 पाझर तलाव आहे. या तलावांमध्ये 190.90 दलघमी पाणी साठा होत असून 40 हजार 953 हेक्टर क्षेत्र सिंचनखाली येते. परंतु आज या तलावांमध्ये पाणी शिल्लक नाही. 396 गाव तलाव आहेत. त्यात 15.11 दलघमी पाणीसाठा होतो. त्यामुळे 2 हजार 903 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येते. 4 साठवण तलाव असून त्यात 39 दलघमी पाणीसाठा होवून 84 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येते. परंतू आज या सर्व तलावांमध्ये एक थेंब देखील पाणी शिल्लक नाही. लघु पाटंबधारे प्रकल्प 1 असून त्यात 39 दलघमी पाणीसाठा होवून 90 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येते. यासर्व तलावांची अवस्था पाहिल्यानंतर कोरडे ठणठणीत आहेत.अत्यल्प पावसामुळे यंदा जलसाठ्यांमध्ये असलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.