अवश्य वाचा


  • Share

खंदरमाळवाडीत महाश्रमदान करत गाव पाणीदार करण्याचा संकल्प

संगमनेर (प्रतिनिधी) पाचवीला पूजलेला दुष्काळ संकट मानून त्यावर खापर फोडीत बसण्यापेक्षा, त्यावर मात करुन आपले शिवार पाणीदार व्हावे यासाठी अगदी अबालवृद्धांपर्यंत शेकडो हातांनी रविवारी खंदमाळात ‘महाश्रमदान’ केले. उजाड माळरानावर हातात फावडे-टिकाव घेऊन सुरु असलेली लगबग दुष्काळाशी लढणार्या गावकर्यांच्या एकीचे दर्शन घडवित होती. सरपंच वैशाली डोके यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो नागरिक भर उन्हात राबत होते, त्यांना क्षणाचा विसावा मिळावा, दोन घासांचे अन्न मिळावे याची व्यवस्थाही अगदी डोंगरमाथ्यावरच करण्यात आली होती. ग्रामस्थांसह शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारीही या महाश्रमदानात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रसिद्ध अभिनेता अमिर खान याच्या पाणी फौंडेशनच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील अनेक गावांनी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत सहभाग घेतला आहे. गेल्या 8 एप्रिलपासून गावागावात ‘टँकरमुक्ती’चा नारा देत हजारो हात भर उन्हात राबत आहेत. संगमनेर तालुक्याचा पठार भाग म्हणजे पारंपारिक दुष्काळाचे हक्काचे आगारच. त्यातून मुक्ती मिळावी यासाठी ठिकठिकाणी राज्य शासनाच्या जलयुक्त शिवाराची कामेही झाली. शासकीय योजनांचे काही खरे नाही असे म्हणत तालुक्यातील अनेक गावांनी सामाजिक संस्था म्हणून दुष्काळी गावांसाठी पथदर्शी काम करणार्या पाणी फौंडेशनचा हात धरला. आणि संपूर्ण श्रमदानावर आधारित असलेल्या ‘वॉटरकप’ स्पर्धेत सहभागही नोंदविला. गेल्या महिन्याभरापासून विविध ठिकाणच्या साईटवर पाणलोट विकासाची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. रविवारी (ता.5) पठारावरील खंदरमाळ शिवारातील शिरोळेमळा येथील साईटवर शेकडो गावकरी भल्या सकाळीच हातात फावडे-टिकाव घेऊन डोंगराची वाट चढत होते. नोकरीनिमित्त पुणे-मुंबई शहरांत असलेली मंडळी आपलेही योगदान असावे या भावनेने गावाकडे परतली होती. घराघरातील अबालवृद्धांनी सकाळीच घराला टाळे ठोकून पाणलोटाची साईट गाठली होती. डोंगर उतारावर आखून दिलेल्या रेषेत एकाचवेळी शेकडों हातातील टिकावाचे घाव बसत होते, त्याचवेळी शेकडो हात उचकलेली माती पाट्यांमध्ये भरुन बांधावर ओतीत होते. यात अगदी पाच वर्षांची मुलेही आपल्या चिमुकल्या हातांनी तर सत्तरी ओलांडलेली वृद्ध मंडळी आपल्या थरथरत्या हातांनी श्रमदान करीत घाम गाळीत होती. महिलांचा सहभाग तर खरोखरी वाखाणण्यासारखाच होता. वन विभागाचे परिमंडल अधिकारी रामदास थेटे, वनरक्षक रमेश पवार, नायब तहसीलदार यांच्यासह पाटबंधारे, पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारीही आपल्या संपूर्ण टीमसह महाश्रमदानात सहभागी झाले होते. पाणलोटाच्या या व्यापक कामांमुळे येणार्या पावसाळ्यात खंदरमाळ शिवारात जागोजागी मोठ्या प्रमाणात पाणी अडवून ते जिरवले जाणार आहे. त्यामुळे शिवार पाणीदार होऊन पाण्याच्या उद्भवांना संजीवनी मिळणार आहे. खंदरमाळच्या ग्रामस्थांनी तर पाणीदार होण्यासोबतच कायमस्वरुपी टँकरमुक्ती मिळविण्याचाही चंग बांधला आहे.