अवश्य वाचा


  • Share

पटसंख्येचे कारण सांगून अनेक शाळा होणार बंद?

अहमदनगर(प्रतिनिधी) राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांची माहिती संकलित करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. राज्यात यंदाही कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा होत आहे. नगर जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या जवळपास 88 शाळा आढळल्या आहेत. या शाळांचा अहवाल अद्याप राज्य सरकारला पाठवण्यात आलेला नाही. अहवाल पाठवण्याआधी पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे. याआधी दोन वर्षांपूर्वी वीसपेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला होता. त्यावेळीही जिल्हा परिषदांकडून शाळांची माहिती मागवण्यात आली होती. त्यानंतर यातील अनेक शाळा बंद झाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आल्याने ही मोहीम काहीशी थंडावली होती. आता मात्र राज्य सरकारने कमी पटसंख्येच्या शाळांची माहिती मागवल्याने या शाळा बंद होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मात्र स्थानिक स्तरावरही काही सूचना दिल्या नसल्याचे दिसून आले. तसेच कमी पटाच्या या शाळांचा अहवाल अद्याप पाठवला नसल्याचे सांगण्यत आले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सध्या फक्त जिल्ह्यातील कमी पटसंख्येच्या 88 शाळांची यादी तयार केली आहे. यामध्ये अकोले तालुक्यात सर्वाधिक 23 शाळांचा पट कमी आहे. त्यानंतर पाथर्डी 13, नगर 13 आणि संगमनेर तालुक्यातील 8 शाळा कमी पटसंख्येच्या असल्याचे सांगण्यात आले. कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आणि नेवासा या चार तालुक्यांत एकही शाळा कमी पट असलेली नाही. मागील काही वर्षांपासून शिक्षण विभागाने मी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे धोरण स्वीकारले असून, या वेळीही हे धोरण राबवण्यात येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.