अवश्य वाचा


  • Share

वडगावपान शिवारात धाडसी चोरी; दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

तळेगाव दिघे (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील वडगावपान फाटा परिसरात रात्रीच्यावेळी बंगल्याचा मागील दरवाजा कटावणीच्या सहाय्याने तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील नऊ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख 58 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. मंगळवारी रात्री 1 वाजेच्या नंतर ही घटना घडली. संगमनेर तालुक्यातील वडगावपान फाटा परिसरात संपत सूर्यभान कानवडे हे कुटुंबियासह राहतात. मंगळवारी रात्री ते बंगल्यात झोपलेले असताना रात्री 1 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंगल्याचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. सामानाची उचकापाचक केली. कपाटात ठेवलेले 48 हजार रुपये किंमतीचे चार तोळे सोन्याचे गंठण, 84 हजार रुपये किंमतीचा तीन तोळ्याचा मोतीहार, 22 हजार रुपये किंमतीचे दोन तोळ्याचे कानातील झुबे तसेच चार हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 1 लाख 58 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. सकाळी झोपेतून उठल्यावर चोरीचा प्रकार कानवडे कुटुंबियांच्या लक्षात आला. त्यांनी चोरीच्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी श्‍वान पथक व ठसे तज्ञांसह घटनास्थळी येऊन चौकशी केली. मात्र चोरट्यांचा माग निघू शकला नाही. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. याप्रकरणी संपत सूर्यभान कानवडे यांनी चोरीची फिर्याद दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विष्णू आहेर अधिक तपास करीत आहेत. चोरीच्या या घटनेने वडगावपान पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.