अवश्य वाचा


  • Share

घुलेवाडीत विखेंच्या अभिनंदनाचे फ्लेक्स फाडल्याने तणाव

संगमनेर (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीत शिर्डी व नगर मतदार संघात शिवसेना-भाजप युतीने जोरदार मुसंडी मारत मोठा विजय संपादन केला. खा.डॉ. सुजय विखे व खा. सदाशिव लोखंडे यांच्या अभिनंदनाचा शहरालगत असणार्‍या घुलेवाडी फाट्यावर लावलेले फ्लेक्स बोर्ड रात्री अज्ञात इसमाने फाडले. डॉ. सुजय विखेंचे फ्लेक्स फाडल्याने घुलेवाडी व परिसरात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण होऊन तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या घटनेचा निषेध म्हणून आज सकाळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत फ्लेक्स फाडणार्‍या इसमांवर कारवाई करावी अशी मागणी केली. दरम्यान या घटनेमुळे आगामी काळात युती आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणूक लागल्यानंतर विखे-थोरात राजकीय संघर्ष तिव्र बनला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या प्रखर विरोधानंतरही डॉ. सुजय विखे प्रचंड मताधिक्क्याने खासदार झाले. तसेच शिर्डीतही लोखंडेंनी मोठा विजय संपादन केला. त्यामुळे संगमनेरच्या विखे समर्थक व शिवसैनिकांना मोठे पाठबळ मिळाले. या विजयानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी घुलेवाडी फाटा येथे ‘आता कोण रोखणार हे वादळ’, ‘आमचा नेता लई पावरफुल’ अशा आशयाचे आ. थोरातांना डिवचणारे भव्य फ्लेक्स लावण्यात आले. दरम्यान सोमवारी रात्री अज्ञात इसमांनी हे फ्लेक्स फाडून टाकले. सकाळी ही घटना समजाताच शिवसेनेचे तालुका प्रमुख जर्नादन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, जयवंत पवार, अशोक सातुपते, राजश्री वाकचौरे, भाजपचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, निलेश पिडीयार, पुरूषोत्तम जोशी, कैलास वाकचौरे, बाळासाहेब राऊत, रवी गिरी, मंदा राऊत, सोनाली गिरी, ललीत ढगे यांसह शिवसेना-भाजप कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विखे समर्थक व शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेत तिव्र संताप व्यक्त केला. सदर फ्लेक्स हे काँग्रेस कार्यकर्त्यांनीच फाडले असुन प्रशासनाने या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन पोलीस प्रशासनाला देऊन या घटनेचा निषेध केला. पोलिसांनीही या गंभीर प्रकरणाची दखल घेत अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. महायुतीच्या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह व जल्लोष आहे. त्यात दुसरीकडे आ.थोरातांना तालुक्यातीलच मतदारांनी साथ न दिल्याने काँगे्रस कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचे वातावरण पसरले आहे. विखे-थोरात यांचा राजकीय संघर्ष शिगेला पोहचला असुन आता कार्यकर्त्यांमधला संघर्षही तीव्र होत चालला आहे. त्यातुनच ही घटना घडल्याचे दिसत आहे.