अवश्य वाचा


  • Share

भंडारदरा काजवा मोहत्सवसाठी सज्ज

भंडारदरा (प्रतिनिधी) भंडारदरा...,कळसूबाई..., घाटघर परिसरातील जंगलात सध्या काजव्यांचे आगमन झाले आहे. जंगलातील आंबा, उंबर, हीरडा, बेहडा, सादडा, जांभूळ अशा निवडक झाडांवरच काजवे आता चमकतांना दिसू लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे याही मे महिन्याच्या शेवटचा पंधरवाडा आणि जून महिन्याचा पहिला पंधरवडा या दरम्यानच्या काळात भंडारदरा-घाटघर-कळसूबाई परिसरातील हजारो झाडांवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरते. कळसूबाईच्या पायथ्याशी वसलेल्या घाटघर, उडदावणे, पांजरे, मुरशेत, मुतखेल, कोलटंभे, भंडारदरा,चिचोंडी, बारी,या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली जातात. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवर काजव्यांची काही क्षणाची का होईना वस्ती असते, ती झाडे ख्रिसमस ट्री सारखी दिसतात! झाडांच्या खोडांवर, फांद्यावर, पानांवर लक्ष लक्ष काजवे बसलेले असतात. लुकलुकत होणारी काजव्यांची प्रकाशफुले आपल्या डोळ्यांना सुखाऊन जातात. कुतूहलमिश्रीत आणि विस्मयचकित मुद्रेने निसर्गवैभव आपण पाहतच राहतो. आणि पहाता-पहाता भान हरपून जातो. शनिवार आणि रविवारी पर्यटकांची भंडारदरा परिसरात गर्दी झाली होती. सध्या तुरळक प्रमाणात काजवे चमकत आहेत. त्यांचा आनंद या पर्यटकांनी लुटला. दरम्यान, काजव्यांचा महोत्सव सुरू होताच मान्सून लवकरच येतो अशी भावना आदिवासी बांधवांची आहे.