अवश्य वाचा


  • Share

प्रभाग 10 (अ) मध्ये पोटनिवडणूक जाहीर

संगमनेर (प्रतिनिधी) प्रभाग 10 (अ) ची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेनेचे नगरसेवक लखन घोरपडे यांना पदावर राहण्यास अपात्र ठरवण्यात आल्याने 23 जूनला या जागेसाठी मतदान होत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोर्चेबांधणीस सुुरुवात झाली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग 10 (अ) मधून शिवसेनेकडून घोरपडे निवडून गेले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार घनश्याम जेधे आणि अपक्ष अरुण वाकचौरे यांचा पराभव केला. नंतर जेधे आणि वाकचौरे यांनी घोरपडे यांच्या जातवैधता प्रमाणपत्रास हरकत घेत निवड रद्द ठरवण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेतली. समितीनेदेखील घोरपडे यांचे जात प्रमाणपत्र रद्द ठरवले. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी घोरपडे यांना अपात्र ठरवले. 30 मे ते 6 जून या कालावधीत (2 आणि 5 जूनची सुटी सोडून) नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्रे ऑनलाइन दाखल करायची आहेत. नंतर त्याची प्रत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दाखल करता येईल. अपील न आल्यास लगेचच 7 जूनला उमेदवारी अर्जाची छाननी केली जाईल. माघारीसाठी 13 जूनपर्यंत मुदत असून मतदान 23 जूनला घेतले जाणार आहे. 24 जूनला मतमोजणी होईल. निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना, काँग्रेससह काही अपक्षदेखील तयार असून प्रमुख लढत शिवसेना काँग्रेसमध्येच होण्याची चिन्हे आहेत.