अवश्य वाचा


  • Share

निळवंडे कालव्यांसाठी तळेगावामध्ये रास्तारोको

तळेगाव दिघे (प्रतिनिधी) अकोले तालुक्यात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बंद पाडण्यात आलेले निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे त्वरीत सुरु करावीत, घाट माथ्यावर वाहुन जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात वळवावे. निळवंडे कालव्यांसाठी पुरेसा निधी तात्काळ द्यावा व 182 गावांचा दुष्काळ कायमचा संपवावा या मागणीसाठी आज सोमवारी सकाळी निळवंडे कालवे कृती समितीच्या वतीने तळेगाव दिघे येथे भव्य रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या वेळी संतप्त शेतकर्‍यांनी शासन व अकोले तालुक्याच्या नेतृत्वाविरुध्द तीव्र घोषणाबाजी केली. गेली अनेक दशके निळवंडे कालव्यांच्या पाण्यापासुन संगमनेर तालुक्यातील तळेगाव भागातील 182 गावे वंचित आहे. केवळ शासनाच्या निष्काळजी व नेतृत्वाच्या गलथान कारभारामुळे ही गावे गेली अनेक दशके दुष्काळाने होरपळत आहेत. यावेळेस शासनाने निळवंडे कालव्यांसाठी पुरेशा निधीची तरतूद केली मात्र अकोले तालुक्यात 0 ते 28 कि.मी. अंतरातील कालव्यांची कामे तांत्रिक कारण सांगून बंद पाडण्यात आली. याबाबत निळवंडे कालवा कृती समितीने न्यायालयात दाद मागितली उच्च न्यायालयानेही अकोले तालुक्यातील बंद पाडण्यात आलेली कामे पोलिस बंदोबस्तात सुरु करावी असे आदेश प्रशासनाला दिले. मात्र अद्यापही ही कामे सुुरु करण्यात प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या निळवंडे कालवा कृती समितीने आंदोलनाचे हत्यार उपसत आज तळेगाव येथे भव्य रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाने प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता यावेळी वक्त्यांनी आपली भुमिका मांडताना प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनासाठी जेवढा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तेवढाच पोलीस बंदोबस्त निळवंडे कालव्यांच्या कामाला अडसर करणार्‍यांच्या बंदोबस्तासाठी लावला असता तर आज या शेतकर्‍यांना उन्हातान्हात रास्तारोको करण्याची गरज भासली नसती. शासन व विरोधी पक्ष निळवंडेचे केवळ राजकारण करत आहे. मात्र या राजकारणामुळे 182 गावे अनेक दशके दुष्काळाने होरपळत आहे. शेती, चारा, पाणी, रोजगार यामुळे येथील शेतकरी विस्थापित होत आहे. या विस्थापित शेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी त्यांना मिळावे यासाठी अकोले तालुक्यात निळवंडे कालव्यांची अडविण्यात आलेली कामे त्वरीत सुरु करावी तसेच घाट माथ्यावर वाहुन जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात वळवून गोदावरी खोर्‍याचा दुष्काळ कायमस्वरुपी हटवावा अशी एकमुखी मागणी यावेळी सर्व शेतकर्‍यांनी केली. या आंदोलनासाठी परीसरातील हजारो शेतकरी उपस्थित होते. पोलिसांनीही मोठा पोलीस बंदोबस्त लावून हे आंदोलन यशस्वी हाताळले. या आंदोलनामुळे सुमारे दोन तास येथील वाहतूक ठप्प झाली होती.